मोबाईल किणकिणला म्हणून तीने नजर वळवली, आणि तीला खुदकन हसु आले. ती मोबाईलची मागची बाजु कानाला लावणार होती. तीला त्याची आठवण झाली.
“शैलेंद्रला तुझ्याशी बोलायचे आहे” असे म्हणून, स्वत:चा मोबाईल हातात ठेवुन तो गर्रकन निघुन गेला होता. ती शैलेंद्र बरोबर बोलण्यात गर्क होती. परत समोर येऊन उभा राहीला, पण चेहऱ्यावर मिश्किल हसु होते. तीला क्षणभर कळेना, काय झाले, ती स्तब्ध झाली. तसे पण ती , त्याला समोर बघितले कि गोंधळुन जाते, मन सैरभैर होतं. त्याच्या हावभावावरुन आपण परत काहीतरी गाढवपणा केलेला आहे हे तीने ताडले. तिच्या चेहऱ्यावरच्या प्रश्नचिन्हाकडे दुर्लक्ष करत तो म्हणाला ” माझ्या मोबाईलला उलट्या दिशेने बोलायची सुविधा आहे , हे मलाच माहीत नव्हते!”
तीला स्वत:च्या बावळट्पणाचा राग पण येत होता आणि त्याच्या मिश्किलपणात रंगावेसे पण वाटत होते.
तो समोरून गेल्यावर आठवले, त्याने जसा मोबाईल दिला होता, तसाच त्याच्याकडे न पाहाता घेतला. त्याच दिशेने पकडुन बोलायला सुरवात केली. शी ! किती गावंढळपणा भरलाय असं म्हणून ती कामाला लागली होती. कितीतरी दिवस त्याच्यासमोर मोबाईल वाजला की घ्यायचे टाळत होती.
आता तो प्रसंग झर्रकन तिच्या डोळ्यासमोर तरळला. त्याच्या आठवणी बाजुला सारुन तीने मोबाईल उचलला. खोटे खोटे हसत मैत्रीणिशी बोलण्यात स्वत:ला गुंतवु लागली.