सध्या जोरात चालु असलेल्या “रात्रीस खेळ चाले” ह्या मराठी मालिकेचे परिक्षण नाहीये. ही आहे गोष्ट एका रंगलेल्या गाण्याच्या मैफिलिची !
नुकत्याच झालेल्या आमच्या कर्जत निवासी शिबिरात रात्रीच्या जेवणानंतर जाधव सरांनी सर्वाना चित्रांबद्दल मार्गदर्शन केले. काही दमलेल्या जीवांनी झोपणे पसंत केले. पण आमच्या पैकी काही अतिउत्साही कलाकारांनी स्वयंपाकघरातील टेबलावरच गाणे गुणगुण्यांस सुरुवात केली.
साथ होती अंकुरच्या गिटारची , तावड़े सरांच्या चमचा तरंग ची ( जलतरंग सारखेच तावड़े सरांनीे निर्माण केलेले नविन वाद्य) आणि प्रत्येकाने धरलेल्या टेबलवरील ठेक्याचीे. मैफिलीचे चमचमते तारे होते अंकुर, वैभव, श्रुती, अक्षयं, राजेश , अनिल व विवेक. राजश्री मॅडम , स्नेहा मॅडम, अनुराधा ह्या पण हिरीरीने एक एक फरमाइश करत होत्या. चित्रकार हरहुन्नरी असतो असे म्हणतात ( नक्की माहित नाही) पण त्या रात्रि अनुभव आला प्रत्येकाच्या हरहुन्नरीपणाचा!
साधारण एक वाजता सगळ्यांना चहाची तल्लफ आली समोर ओपन स्वयंपाकघर होते, पण रिसोर्ट च्या मॅनेजरच्या परवानगी शिवाय आत कसे जाणार ? आणि एवढ्या रात्री मॅनेजरला कुठे शोधणार ?
काही खलबतं झाली आणि तावड़े सर, स्नेहा मॅडम व वैभव यांनी स्वयंपाकघराच्या मागील दाराने आत प्रवेश मिळवला. त्यानंतर झाली चहा ,साखर, दुध आणि पातेले ह्याची शोधमोहीम ! सगळ्यांनी निष्णात असल्यासारखे सर्व वस्तूंचा फटाफट शोध लावला . शिवाय बाहेरून सगळ्या वस्तूंची दिशा दाखवण्याचे अतुलनीय काम मी व राजश्रीने पार पाडले.
स्नेहा मॅडमनी बनवलेल्या फक्कड चहाची चव आजही जिभेवर रेंगाळते. त्यानंतर वैभवची नजर कलिंगड वर गेली … मग सूरी कुणी आणली आणि कलिंगडचा फडशा कसा पडला ते आम्हाला कळलेच नाही. अगदी नाईलाजाने रात्रौ २ वाजता आम्ही आमची मैफल तसेच कामगिऱ्या थांबवुन झोपावयास गेलो. अर्थातच दुसऱ्या दिवशी आम्ही रिसॉर्टच्या मॅनेजरला सर्व गोष्टींची कल्पना दिली.