सहा महिन्यात ५००० स्केचेस पूर्ण करण्याची स्पर्धा फेसबुक वर पाहिली . माझे स्केचिंग एवढे चांगले नाही , खूप वाईट हि नाही . ह्या स्पर्धेत दररोज २७ स्केचेस करणे अभिप्रेत होते, म्हणून सहभागी होण्याचे धारिष्ट नाही करू शकले. साधारण एक महिन्याने , माझ्यातील विद्यार्थिनी जागी झाली. मी ह्या स्पर्धेत एक महिना उशीरा सहभागी झाले त्यामुळे अर्थातच प्रत्येक दिवशी काढायच्या स्केचेस ची संख्या ३०-३५ एवढी झाली.
काहींच्या मते हे आव्हान खुपच कठीण आहे. काहींच्या मते ह्या मुळे अंकात्मक तुलना होतेय , गुणात्मक निकष कठीण आहे. निश्चितच ! गुणात्मक ,संख्यात्मक , वेगळेपण असे विविध निकष स्पर्धेला हवे , स्पर्धा हि आव्हानात्मकच असायला हवी !
प्रत्येक जण आपापल्या परीने नेहमीची लढाई लढत असतो . आपण आपल्या संघर्षांना जोजावत बसतो .बऱ्याचदा आपण मनातील आवडी निवडीचा अशीच चालढकल करत जातो. अशावेळी एक वेगळी उर्मी ,त्यातून वेगळी वाट चोखाळायची संधी अशा स्पर्धेमुळे मिळते.
मला हे माहित आहे कि हे आव्हान कठीण आहे. पण म्हणून प्रयत्न न करणे हे मान्य नाहि . म्हणूनच माझे आव्हान हे माझ्या पहिल्या स्केचपेक्षा दुसरे आणि दुसऱ्या पेक्षा तिसरे स्केच चांगले काढणे हे आहे. ५००० हा आकडा आपोआप तयार होइल. आणि समजा ५००० नाही झाले तरी, त्या निमित्ताने अभ्यास तर होईल , असा विचार मी केला. थोडक्यात माझी स्पर्धा हि सर्वप्रथम माझ्या स्वत: शी आहे.
ह्या स्पर्धेतील माझ्या इतर स्पर्धकांची स्केचेस पाहणे हि एक माझ्यादृष्टीने पर्वणीच आहे. पेठेसरांच्या स्केचेस चा ठेवा माझ्यासमोर मुंबईत सहज उलगडतो. नविन ऑनलाइन मित्र मैत्रिणी मिळाले. प्रदिप राउत सरांचे अमुल्य मार्गदर्शन वेळोवेळी मिळते आहे. माझ्या दृष्टीने माझे ५००० चे आव्हान आत्ताच पूर्ण झाले आहे. हा आगळावेगळा आनंद दिल्याबद्दल प्रदिप राउत सरांचे आभार . सर्व सहभागी कलाकारांना शुभेच्छ्या !