ति त्याला विसरण्याचा असफ़ल प्रयत्न करुन थकली. मनाला मुरड घालुन जगण्याची सवय तीने हट्टाने आपल्या मनाला घातली. पण अश्याच एका बेसावध क्षणी त्याचा फ़ोन पाहुन एकदम हरखुन गेली.नकळत चेहऱ्यावर प्रसन्न हसु उमटले. ज्या क्षणासाठी आपण धडपडतो, तो क्षण समोर आल्यावर त्याला सामोरे जाण्याचे धैर्य होत नाही, मन तो क्षण अनुभवायला देखील कचरते, असे काहीसे झाले.
काय करतेस? कुठे आहेस? ….
घरीच आहे…. आणि मग नेहमी प्रमाणे मनातील सर्व सांगुन मोकळी झाली.
त्याने विचारले ….तू ठिक आहेस ना?
हो तर…मी ठिक आहे..
पण त्याचे परत परत तू ठिक आहेस ना, हे विचारणे….तीला घायाळ करुन गेले…मी तुझ्याशिवाय ठिक असेन का, हा प्रश्न तीने ओठावरुन परतवुन लावला. इतक्या मुश्कीलीने त्याच्याशीवाय रहायची सवय लावून घेतली. काय जादु आहे ह्याच्याजवळ , कि सर्व दोन मिनीटात विसरायला लावतो.
त्याचे बोलावणे इतके मनाला भुरळ घालु लागले, कि एक सुक्ष्मशी कळ ह्र्दयात उमटली. मनातील खळबळ त्याला समजु नये म्हणुन तिची धडपड सुरु झाली. शब्द तीच्याकडुन घरंगळु लागले. परत येणाऱ्या विरहाला सामोरे जाण्याची ताकद आपल्यात नाही, हे तीला पक्के ठाउक होते. पण त्याला कसे समजावे , तीला कळेना. तो तर लहान मुलासारखा हट्टाने विचरत राहीला. खुप छान आहे असं का म्हणत नाहीस? …..हा चक्रव्युह तोडायचा तर, त्याला राग येइल असे काहीतरी शब्द ती शोधु लागली.